बुधवार, १८ जुलै, २०१२

शरद पवारांशिवाय क्रिकेट...!


गुगलवर नुसतं शरद पवार टाईप करा तुम्हाला फक्त 8,76,000 हजार पाने मिळतील. पण हेच जर तुम्ही 'शरद पवार क्रिकेट' असे तीन शब्द एकत्रित टाकलेत तर मिळतात एकूण 13,60,000 पाने... म्हणजेच तब्बल पाच लाख पाने जास्त... शरद पवाराचं क्रिकेटशी काय नातं आहे हे सांगणारं हे एक उदाहरण... आणि हेच शरद पवार आता क्रिकेटमधील आपलं अवतार कार्य येत्या रविवारी संपुष्टात आणतायत.. शरद पवारांशिवाय क्रिकेट ! ...मीडियासाठी ही गोष्ट म्हणजे तशी वाईटचं... मैदानाबाहेरील क्रिकेटला रंगतदार बनवण्यात पवारांचा हात कुणीही धरू शकणार नाही. गेली 12 वर्ष क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची कारकिर्द वादळी राहीली. अनेक वादळं त्यांनी अंगावर घेतली आणि आपल्या अंगीभूत सामर्थ्यांनं त्यांचा मुकाबलाही केला. भारतीय क्रिकेटसाठी पवारांची ही कारकिर्द निर्णायकी ठरली. खर तर त्याच्यावर एक अख्ख पुस्तक निघू शकेल, पण आज ही फक्त प्रस्तावनाच...

  

मी त्यावेळी दै. सामनात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून काम पहात होतो. मनोहर जोशी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. मुंबई क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री विराजमान होण्याची ती पहिली वेळ होती. जोशींचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आलेला. जोशीनंतर कोण यावर त्यावेळी सॉलिड सस्पेन्स होता. आणि अचानक एकेदिवशी पवारांच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून निरोप आला. 'पवार साहेब इंटरव्ह्यूव्ह देतायत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी".. मी दै. सामनाचा प्रतिनिधी, त्यात शिवसेनेचा अजित वाडेकर यांना पाठिंबा माझ्यासमोर पेचप्रसंग... संजय राऊत हे माझे संपादक, मी राऊत सरांकडे विचारणा केली आणि त्यांनी मला क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिली. दुसर्‍या दिवशी पवारांचा दै.सामनात हाफ पेज इंटरव्ह्युव्ह... अनेकांच्या त्यावेळी उंचावलेल्या भुवया मला आजही आठवतायत. माझा पवारांना पहिलाच प्रश्न होता मी दै. सामनातून आलोय. अनेक अडचणींचे प्रश्न सोबत घेऊन..त्यावर ते दिलखुलास हसले होते. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे अचूक उत्तर होते. 'नो कॉमेंट' हे शब्द जणू त्यांच्या शब्दकोषातचं नसावेत. अशाप्रकारे पवारांच्या क्रिकेटशी माझा संबध आला तो त्यादिवसापासून..


19 जानेवारीला मुंबई क्रिकेट संघटनेचं इलेक्शन होतं. त्याआधी 17 जानेवारीला वाडेकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यात वाडेकरांचा ड्रायव्हर जखमी झाला होता. दै. सामनात ही बातमी पहिल्या पानावर छापल्यावर दुसर्‍यादिवशी राष्ट्रीय वर्तमानपत्रांनीही त्याची दखल घेतली होती. 19 जानेवारीचा दिवस उजाडला. एमसीएचं वातावरण खुपचं तणावपुर्ण होतं. मी दै.सामनाचा असल्यानं सहाजिकचं पवारांच्या कॅम्पच्या रोषाचा बळी होतो. एमसीएतील माझ्या जुन्ह्या सहकार्‍यांनी तर मला रिपोटीर्ंगला येऊ नको असेही बजावले होते. न जाणो पवार हरलेच तर समर्थक तुला टार्गेट करतील अशी काळजीयुक्त माहितीही त्यांनी मला दिली होती. तरीही मी आवर्जुन गेलो. मला त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार व्हायचं होतं. पवार जिंकले तर बातमी होतीच, पण हरले त्यापेक्षा मोठी बातमी होती.. पण पवार जिंकले... एकुण 185 मतं पवारांना पडली. तर 125 मतं वाडेकर यांच्या खात्यात जमा झाली. पवारांच्या विजयानं मग वातावरणातील सगळं टेन्शन दुरं झालं. गेली 10 वर्ष त्यांनी अनभिषिक्तपणे मुंबई क्रिकेटवर राज केलं. अनेक वाद मिटवले, नवे जन्माला घातले.

पवारांच सगळ्यात लक्षात राहण्यासारखं काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली 'सीआयसी' म्हणजे क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटी.. संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या हाती वर्षानुवर्ष असलेल्या क्रिकेट विकासाची मक्तेदारी पवारांनी मोडीत काढून ती क्रिकेटर्सच्या हाती सोपवली. त्यात अगदी क्रिकेटच्या टीम निवडीपासून ते मैदानाच्या तयारीपर्यंत सगळे निर्णय हे क्रिकेटचा भरणा असलेल्या क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीकडे सोपवले. दुसरे म्हणजे पवार हे गरवारे क्लबचे अध्यक्ष होते. गरवारे क्लब आणि वानखेडेतून विस्तव जात नव्हता. दोघांकडून कोर्टकचेरीपायी करोडो रुपये खर्च झाले होते. पवारांनी आपल्या कारकिर्दीत दोघांत समेट घडवून आणला. बीसीसीआयचं मुख्य कार्यालय मुंबईत दिमाखात उभं केलं. वानखेडे स्टेडियम वर्ल्डक्लास बनवलं. मुंबई क्रिकेट हा काही पवारांचा अंतिम टप्पा नव्हता.. जेथे जाऊ तेथे नंबर एक बनलं पाहिजे हा त्यांचा ध्यास. त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचं स्वप्न पडलं. पण तेथे जगमोहन दालमिया त्यांच्या आड आले.

सार्वजनिक जीवनात पवार फक्त एकचं निवडणूक हरले आणि तेही क्रिकेटच्या मैदानावर.. दालमियांचे समर्थक रणविर सिंग यांनी अवघ्या एका मतानं पवारांना पराभूत केलं. दगा हा गाफिल असतानाचा होतो तसा पवारांच्या बाबतीत घडलं. ज्या महाराष्ट्रानं त्यांना घडवलं. राजकीय चेहरा दिला त्याच महाराष्ट्रातील, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील संधोपसुंधीनं पवारांचा घात केला. ज्ञानेश्वर आगाशे आणि अजय शिर्के यां दोघांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर दावा ठोकल्यानं महाराष्ट्राचे मतचं बाद करण्यात आलं. दालमियांनी यात मोठं राजकारण केलं. त्यामुळे पवार आणि रणविर सिंग यांना समसमान 15-15 मतं पडली. अशावेळी दालमिया यांनी आपल्या अध्यक्षपदाचं मत रणविर सिंग यांच्या पारड्यात ठाकून पवारांचा रोष ओढावून घेतला. हार मानतील ते पवार कसले. पुढच्याच टर्मला फुल प्रुफ प्लॅनिंग करून पवार बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. आणि दालमियांवर 1996 च्या भ्रष्टाचाराचे आरोप 2005 मध्ये ठेवून त्यांना क्रिकेटमधून बडतर्फ केले. हे फक्त पवारचं करू शकतात.

दालमियांनी क्रिकेटमध्ये अब्जोवधी रुपये आणले. ते बीसीसीआयच्या तिजोरीत जमा झाले. पण तिजोरीत बंदिस्त असेलेले हे पैसे खेळाडूंच्या खिशापर्यंत नेण्याचं काम शरद पवारांनी केलं. खेळाडूंना निवृत्ती वेतन देण्याची त्यांची योजना सुपरडूपर हिट ठरली. त्यांच्याच काळात आयपीएल जन्माला आलं. केवळ स्टार क्रिकेटर्सच नव्हे तर लोकल क्रिकेटरही श्रीमंत झाले. पण क्रिकेटमधिल हा खळाखळाणारा पैसा क्रिकेटचं वैभव नष्ट करतोय अशी टीकाही त्यांच्यावर झाली. पवारांच्या कारकिर्दीतचं वर्ल्डकप क्रिकेटचं यशस्वी आयोजन झालं. आणि विशेष म्हणजे भारतानं हा वर्ल्डकप जिंकालाही. भारतानं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळीही बीसीसीआयचे अध्यक्ष एक मराठीचं माणूस होता. एनकेपी साळवे तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते, आणि 2011 साली भारत वर्ल्डकप जिंकला तेव्हा शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. 1983 च्या वेळी वर्ल्डकप विजेत्यांसाठी पैसे जमा करण्याकरीता साळवे यांना लतादिदींना गाण्यासाठी साकडे घालावे लागले होते.पवारांच्याच कारकिर्दीत टी 20 चा वर्ल्डकप भारतानं जिंकला.

भारतीय क्रिकेटमधिल मॅचफिक्सिंगचा भूकंप पवार क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी झाला होता, पण त्याचे पडसाद त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतही उमटलेचं, पण पवार या सर्वाला पुरून उरले. प्रत्येक समस्येवर उपाय असतो, फक्त तो शोधायचं असतो, इतरांच्या तुलनेत पवार हा उपाय अधिक वेगानं शोधायचे इतकेचं... अर्थात हे सगळं इतकं सरळ सोपं साधं आणि आदर्श होतं असं नाही बरं का.. पवारांच्या या 12 वर्षात अनेक घटना अशा घडल्या ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात अजुनही दबक्या आवाजात चवीनं बोललं जातं. शरद पवारांविरोधात वाडेकरांनंतर दुसर्‍या टर्मला एमआयजीचे प्रवीण बर्वे उभे राहणार होते.पण रातोरात बर्व्हेंच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडते काय आणि त्यांना नाना चौकश्यांना सामोर जावे लागते काय... बीसीसीआयची निवडणूक ज्या ज्ञानेश्वर आगाशेंमुळे पवारांना गमावावी लागली ते आगाशे त्यांच्या उर्वरीत आयुष्यात देशोधडीला लागले... बँक घोटाळ्याप्रकरणी तर त्यांना जेलही झाली. यामागे काही कार्यकारण भाव आहे की पवार फोबीया ? याची उत्तरे येणार काळ देईलचं.

पण एक मात्र नक्की या घटनांवरुन युध्दात, प्रेमात आणि क्रिकटमध्ये सबकुछ माफ असते अशी नवी म्हण जन्माला आली एवढं खरे... असो, पवार यांनी क्रिकेटमध्ये पॉवरफुल राज्य केले. आधी म्हटल्याप्रमाणे मैदानावरील क्रिकेट एवढेचं मैदानाबाहेरील क्रिकेटही त्यांनी रोचक आणि रोमहर्षक केलंय.



संदीप चव्हाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी व्यासपीठ