बुधवार, १८ जुलै, २०१२

हिरवं कोकण...


एन्रॉनमुळे गेली अनेक वर्षं गाजावाजा झालेला गुहागरजवळचा दाभोळ खाडीचा टापू. खाडीच्या विस्तीर्ण पसारा बघत वळणावळणाच्या रस्त्यानं डोंगर चढून गेलं की धोपावेचा माळ येतो. पर्यावरण दिनाच्या निमित्त कोकणाची यात्रा करतकरत आम्ही आणखी एका माळावर येऊन पोहोचलो होतो. खाडीच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर हिरवाईनं वेढलेल्या एका माळावर. उन्हं चढत जातात तसं या माळाला एखाद्या युद्धभूमीचं रूप येऊ लागतं. ट्रक, टेम्पो, गाड्या, मोटरसायकली...मिळेल ते वाहन पकडून आलेले आजुबाजूच्या गावांतले, खाडीच्या अलीकडचे, पलीकडचे, डोंगरउतारावरच्या वस्तीतले लोक एकत्र जमा व्हायला लागतात.

वेगवेगळ्या भागांतून आलेल्या या गावकर्‍यांचा निर्धार एकच आहे. धोपावेच्या माळावर सर्व्हे करण्यासाठी आलेल्या सरकारी लोकांना परतवून लावण्याचा. एरव्ही बड्या बड्या कंपन्यांशी सुरू असलेली लढाई इथे मात्र सरकारशी आहे. कारण धोपावेच्या माळावर महाजनकोचा औष्णिक वीजप्रकल्प येतोय. आणि या प्रकल्पाला धोपावेच्याच नव्हे तर दाभोळ, दापोली, जयगड या सगळ्या पट्‌ट्यातल्या गावकर्‍यांचा तीव्र विरोध आहे.
याच परिसरानं काही वर्षांपूर्वी एन्रॉन विरुद्धच्या आंदोलनाची धग अनुभवली होती. धोपावेला जाताना एन्रॉन  म्हणजेच आताच्या रत्नागिरी गॅस पॉवर लिमिटेड प्रकल्पाच्या भल्यामोठ्या चिमण्या दिसत राहतात. या प्रकल्पापासून काही किलोमीटरच्या अंतरातच धोपावेचा औष्णिक प्रकल्प येऊ घातलाय. त्यातच भोपणला GMR कंपनीनं आणखी एका प्रकल्पाची घोषणा केलीय. हा प्रकल्प कोळशावर चालेल की गॅसवर हे अजून अधांतरीच आहे. पुढे दापोलीजवळ अंजर्ल्याला आणि केळशीला टियाना ग्रुपच्या ओष्णिक प्रकल्पांची घोषणा झालीय. मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णे बंदराजवळही आणखी एक औष्णिक प्रकल्प येतोय.

ज्या परिसरात याआधी एका वीजप्रकल्पानं एवढं रणकंदन माजवलं त्याच परिसरात एवढे सहासहा प्रकल्प का आणायचेत तुम्हाला ? कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प इथे आणून तुम्हाला नेमका कुठला विकास साधायचाय ? अशा विनाशकारी प्रकल्पांनी आमच्या हिरव्यागार कोकणाचं काय होईल..? आमच्या पुढच्या पिढ्या कशावर जगतील ? याचा विचार केला आहात का तुम्ही ? एकामागून एक प्रश्नांनी माळ घुमत होता.. कोकणच्या माणसांचा या लढ्याचे ढोल अख्खा खाडीच्या टापूत वाजत होते. इथले वारे आता बदललेत. एकेकाळी समृद्ध कोकणाचा कॅलिफोनिर्या करण्याच्या घोषणा इथे दिल्या जायच्या, पर्यटन, फळबागायतीच्या मोठमोठ्या योजना आखल्या जायच्या तिथे आता या किनारपट्ट्ीला औष्णिक प्रकल्प आणि मायनिंगचा वेढा पडलाय. कोकणची समृद्धी वाढवण्यासाठी झटणार्‍या माणसांना आता आहे ती निसर्गसंपत्ती वाचवण्यासाठी लढा द्यावा लागतोय.

गुहागरजवळच्या धोपावेच्या या माळावर हाच लढा सुरू आहे, त्याच घोषणा आहेत आणि तेच प्रश्न. हा माळ आत्ता दिसतो तसाच होता रत्नागिरीजवळच्या जयगडचा माळ.. बंदरावरून समुद्रात जाणारी जहाजं, मच्छिमारी करणार्‍या होड्या, सोसाट्याच्या वार्‍यावर डुलणारी माडांची बनं, डोंगरउतारावरच्या हिरव्याकंच आमराया आणि जांभ्या खडकावर थडकणार्‍या अजस्त्र लाटा .. जयगडचं हे वर्षानुवर्षं बघितलेलं दृश्यं मनात ठेवून इथे गेलं तर धक्का बसतो. जिंदालच्या औष्णिक वीजप्रकल्पाच्या चिमण्या धूर ओकत असतात. बंदरावरून प्रकल्पात उतरवला जाणारा हजारो टन कोळसा...आणि कोळसा जाळल्यानं तयार झालेल्या फ्लाय ऍशचे म्हणजे राखेचे ढिगारे... वीजनिमिर्तीसाठी समुद्रातून उपसलेलं लाखो लिटर पाणी... आणि टर्बाइन्स थंड करणार्‍या गरम पाण्याचा तिथेच सोडून दिलेला खळाळता प्रवाह.. समुद्राचं हे खारं पाणी इथल्या विहिरींमध्येही झिरपलंय. जयगड आणि नांदिवडे गावातली एकही विहीर पाणी पिण्याजोगी राहिलेली नाही.

आमच्या गावात कधी दिवसांतून एकदा येणार्‍या नळाच्या पाण्यावर राहावं लागेलं, असं वाटलंही नव्हतं. हे असलं विहिरीचं पाणी पिऊन इथे बळी गेलेत. अनेक जण आजारी पडलेत.. नांदिवड्याच्या वस्तीतल्या महिला ओरडून ओरडून सांगत होत्या. आंब्याच्या बागेत कलमांवरचे शेवटचे आंबे उतरवण्याचं काम चाललं होतं. पण पुढच्या वर्षी आंबे धरतीलच याची शाश्‍वती बागायतदारांना नव्हती. रिलायन्सच्या औष्णिक प्रकल्पामुळे डहाणूच्या चिकूच्या बागांचं जे झालं तेच आमच्या आंब्याचं होईल..झाडांवर फ्लायऍश पडल्यामुळे मोहोर गळून पडेल..याची चिंता प्रत्येक जण सारखी बोलून दाखवत होता.

गावावर हे आक्रित येणार आहे..हे जयगडच्या लोकांना माहीत होतं. आणि म्हणूनच त्यांचा या प्रकल्पाला विरोध होता. पण प्रकल्पाचं राजकारण झालं, वेगवेगळे गट पडले आणि अखेर गावाची फसगत करून जिंदालचा औष्णिक वीजप्रकल्प उभा राहिला. आता इथे उरलंय..ते औष्णिक प्रकल्पाच्या राखेचं, खार्‍या पाण्याचं प्रदूषण आणि आवाज हरवून बसलेले गावकरी..यातून धडा घेऊन पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी कोर्टात लढा दिला तेव्हा कुठे पर्यावरण परवान्याच्या मुद्द्यावर या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याला स्थगिती मिळाली.

दाभोळ, दापोलीच्या लोकांना ही वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाहीये. आणि म्हणूनच कागदपत्रांनिशी, नियमांच्या चौकटीत, पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास करून लोक लढतायत. एकत्र येतायत. बेकायदेशीर, प्रदूषणकारी वीजप्रकल्पांविरुद्ध आवाज उठवतायत. तुमच्याकडे प्रकल्पासाठी पर्यावरणाचा परवाना आहे का ? तो नसताना प्रकल्पासाठी जमिनीचा सर्व्हे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे टोकदार सवाल सरकारी यंत्रणांना ठणकावून विचारतायत.

 कोकणी माणूस प्रत्येक प्रकल्पाला, विकासाला विरोध करतो, असा उद्योजकांचा आणि सरकारचा अजब दावा. पण इथली मूळ निसर्गसंपत्तीच नष्ट करून काय विकास होणारेय याचं उत्तर इथल्या लोकांना कुणीच देऊ शकलेलं नाही. हा असा विनाशकारी 'विकास' रोखण्यासाठी जिथे जिथे गावकरी एकत्र आले तिथे सरकारला त्यांच्यापुढे झुकावंही लागलंय.

सिंधुदुर्गातल्या विजयदुर्गमधलं गिरये हे गाव औष्णिक प्रकल्पांविरुद्धच्या लढ्यामध्ये बाजी मारून गेलं. समद्राकाठीचं मोठं पठार असलेलं आंबाबागायतीचं हे गाव. आपल्या गावात कोळशावरचा वीजप्रकल्प येणार आहे..त्यासाठीचा प्रस्ताव आलाय..याची कुणकुण गावकर्‍यांना लागली तेव्हापासूनच नियमानं, कायदेशीर बाबी चोख ठेवून या गावानं लढा दिला. हा प्रकल्प आला तर आपली बागायत कायमची जाईल..हे गिरयेनं ताडलं. ग्रामसभांचे ठराव झाले..प्रकल्पाला एक इंचभरही जमीन न देण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आणि अखेर सरकारला गिरयेतून माघार घ्यावी लागली.पण हाच प्रकल्प आणखी दुसर्‍या समुद्रकिनार्‍यावर हलवला जाणार नाही ना..याची धाकधुक आंदोलकांना आहेच.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी व्यासपीठ